पारनेर / भगवान गायकवाड, 

श्री साईनाथ हायस्कूल, अळकुटी येथील 1992 गोल्डन बॅचचा स्नेहमेळावा नुकताच अलीबाग (नागाव बीच – मुरुड जंजिरा) येथे अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. “दिल दोस्ती दुनियादारी” ही संकल्पना या गेट-टुगेदरची ओळख ठरली.

या गेट-टुगेदरचे आयोजन व नियोजन डॉ. संदीप औटी, गोविंद साबळे, श्रीकांत डेरे,बाळासाहेब पुंडे आणि सचिन साखला यांनी केले होते. त्यांच्या समन्वयामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

आनंद ट्रॅव्हलच्या बसने प्रवासाला सुरुवात होताच गाणी, अंताक्षरी, खाद्यविषयक खेळ आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे किस्से यामुळे संपूर्ण प्रवास आनंदमय झाला. मैत्रीतील आपुलकी आणि जिव्हाळा प्रत्येक क्षणात अनुभवायला मिळाला.

नागाव समुद्रकिनारी सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत गप्पा-टप्पा, खेळ, संगीत खुर्ची यांसारख्या उपक्रमांतून शालेय जीवन पुन्हा जिवंत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रदर्शन, सामूहिक फोटोसेशन तसेच निळी पॅन्ट-पांढरा शर्ट या ड्रेसकोडमधील ग्रुप फोटो हे विशेष आकर्षण ठरले.

यानंतर मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या भेटीने सहलीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. परतीच्या मार्गावर स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत हा संस्मरणीय प्रवास पूर्ण झाला.

परतीच्या वेळी सर्वांनी व्यक्त केलेल्या मनोगतात मैत्री, कृतज्ञता आणि भावनिक जिव्हाळा प्रकर्षाने दिसून आला. वर्षानुवर्षे टिकून असलेली मैत्री आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचा निर्धार या गेट-टुगेदरमधून अधोरेखित झाला.

“मैत्री म्हणजे वेळेच्या पलीकडे टिकणारं नातं” या भावनेने प्रेरित होत, 1992 गोल्डन बॅचने असेच दरवर्षी एकत्र येण्याचा संकल्प व्यक्त केला.

🔶🔶🔶🔶🔶🔶
जुने मित्र म्हणजे आठवणींचा जिवंत खजिना असतो.मैत्री कधीच संपत नाही ती फक्त पुढच्या भेटीची वाट पाहते.त्यामुळे मित्रांनो असेच दरवर्षी भेटूयात ,शाळेच्या आठवणी जागूयात.मैत्री हीच खरी श्रीमंती असते चला ती जपूया.
       – डॉ.संदीप औटी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version