पारनेर / स्वप्निल भालेराव,
मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग हा आधुनिक तंत्रज्ञान झाला आहे. तंत्रज्ञानाशिवाय जीवन जगणे सुसह्य होऊ शकत नाही. नुकत्याच झालेल्या सर्वेनुसार जुलै महिन्यामध्ये ChatGPT वर सर्वसाधारणपणे एका दिवसाला 2.5 अब्ज प्रश्न वापरकर्त्यांनी विचारले आहेत. गूगल किंवा इतर सर्च इंजिन वर माहितीचा महाकाय स्रोत जरी उपलब्ध असले तरी त्याला मर्यादा येतात.त्याची विश्वसनीयता किंवा नेमकेपणा त्यात आढळून येत नाही. जसे तंत्रज्ञान आपल्याला सर्व क्षेत्रात सहाय्य करते त्याप्रमाणे शिक्षणक्षेत्र यापासून दूर राहू शकत नाही. उच्च शिक्षण क्षेत्रात ए आय चा वापर मोठ्या प्रमाणात सुरु असला तरी प्राथमिक शिक्षण विशेषतः सरकारी प्राथमिक शाळा या प्रवाहापासून खूप दूर असल्याचे जाणवते. संसाधनांची कमतरता , वापराविषयीची अनभिज्ञता यासारख्या समस्यांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला ए आय ची जोड मिळू शकली नाही. परंतू आजघडीला काही प्रमाणात शाळा,शिक्षक व विद्यार्थी हे तंत्रज्ञान वापरत आहे हे सुखदायक चित्र आहे.
ChatGpt, Gemini, Persplexity यासारखी शेकडो ॲप प्लेस्टोअर वर अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत. आजचे विद्यार्थी हे तंत्रज्ञान वापराचे ज्ञान अगदी सहज शिकतात व यावर आधारित ज्ञान मिळवायला त्यांना अधिक आवडते. ए आय द्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढील फायदे होतील.
* विद्यार्थ्यांना होणारे फायदे –
विद्यार्थ्यांना अध्ययन करताना येणाऱ्या विविध शंका दूर होतीलच असे नाही. विद्यार्थी काही शंका विचारायला शिक्षकांसमोर संकोचतात. अशा वेळेस विद्यार्थी शंका विचारून आपल्या प्रश्नाचे निरसन करू शकतात.
विद्यार्थी आपल्या गतीने शिकू शकतो. न समजणाऱ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण सविस्तर दिल्याने विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेत वाढ होते.आपल्या वेळेनुसार व मनोरंजक पद्धतीने शिक्षण सहज घडून येते. विद्यार्थी स्वतःच्या मातृभाषेत प्रॉम्प्ट देऊ शकत असल्याने व स्मार्टफोन जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी असल्याने अभ्यासासाठी ए आय विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक झाला आहे. सर्व विषयांच्या चाचणी स्वतः तयार करून सोडवल्यामुळे स्वयंमूल्यमापन शक्य झाले आहे.
•शिक्षकांना होणारे फायदे –
शाळाबाह्य कामामुळे प्राथमिक शाळेतली शिक्षकांना अध्यापनासाठी वेळेची कमतरता जाणवते. अशा वेळी ए आय शिक्षकांसाठी उपयुक्त ठरते.
विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय , चाचणी परीक्षा, मासिक व वार्षिक नियोजन काही सेकंदात ए आय तयार करून देते . अध्यापनासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य निर्मिती ए आय च्या मदतीने सहज शक्य आहे. तसेच अध्यापन करताना विविध संदर्भ व दुवे सहज उपलब्ध झाल्याने अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते. सर्व क्विझची निर्मिती करून विद्यार्थ्यांना अध्ययनप्रवृत्त करणे शक्य झाले आहे.विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीचा डाटा सहज उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करणे सोपे झाले आहे. विविध ए आय ॲप्स द्वारे अध्यापन मनोरंजक व प्रभावी करता येते.
•संभाव्य अडचणी व धोके –
ए आयच्या वापराचे अधिक फायदे जरी असले तरी अतिरेक हा मारक ठरतो. सर्व प्रश्नांची उत्तरे तात्काळ व अचूक मिळत असल्याने विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीचा वापर करणे कमी करतील यासाठी प्रबोधन करणे ही शिक्षकांची जबाबदारी असेल. सर्व गोष्टी कमी कष्टात मिळाल्याने विद्यार्थी आळशी बनण्याचा धोका आहे. यासाठी विद्यार्थी व पालक यामध्ये जनजागृती व प्रबोधन करणे काळाची गरज आहे. तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे तिचा वापर प्रत्येकाने सद्सदविवेक बुद्धीने करणे हेच आपल्या हाती आहे.
– श्री.पोपट धोंडीभाऊ भालेराव(चोंभुत, पारनेर )(उपशिक्षक-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरखेड, शिरूर
