पारनेरच्या पाणी योजनेला आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा
तोडगा न निघाल्यास मुंबईत आंदोलनाचा खासदार लंके यांचा इशारा
पारनेर : प्रतिनिधी,
पारनेर शहराला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून प्रस्तावित करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मार्तंडनाना पठारे विचार मंचाचे अध्यक्ष दीपक पठारे यांनी चार दिवसांनंतर शुक्रवारी (ता. २१) उपोषण मागे घेतले. खासदार नीलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मध्यस्थी केल्यानंतर आणि पारनेर नगरपंचायतीच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
नगरपंचायतीचे हे लेखी आश्वासन खासदार लंके यांच्या हस्ते पठारे यांना देण्यात आले.
पाणी योजनेच्या मंजुरीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, फाइल कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे, याची माहिती दोन दिवसांत देण्यात येईल, असे नगरपंचायतीने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चार दिवसांच्या उपोषणानंतर आंदोलनाला तूर्त विराम मिळाला असला तरी पाणी योजनेच्या प्रत्यक्ष मंजुरीकडे आता पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.
पारनेर शहरासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून पाणी आणून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे. या योजनेसाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, तांत्रिक मंजुरीसाठी ७२ लाख ८७ हजार २७७ रुपये शासनाच्या कोषागारात जमा करण्यात आले आहेत. मात्र, दोन वर्षांपासून प्रस्ताव पुढील मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. खासदार नीलेश लंके यांनी सांगितले की, पारनेर शहराची पाणी योजना हा पारनेरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते तसेच नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. तांत्रिक मंजुरीसाठी मोठी रक्कम शासनाच्या कोषागारात जमा करूनही योजना दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.
पारनेरच्या पाणी योजनेसोबत राज्यातील इतर पाणी योजनांना मंजुरी मिळाली असताना पारनेर शहराची योजना मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप लंके यांनी केला. राजकीय कुरघोडीतून ही योजना रखडल्याचे त्यांनी म्हटले.
पारनेरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा राजकारणाचा विषय होऊ नये. शहराला शाश्वत पाणी मिळण्यासाठी ही योजना तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत,असे लंके यांनी स्पष्ट केले.
रखडलेल्या पाणी योजनेचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे लंके यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पारनेर नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि उपोषणकर्ते यांची संयुक्त बैठक घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या बैठकीत पाणी योजनेच्या मंजुरीतील अडथळे दूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही योग्य तोडगा निघाला नाही, तर पारनेरच्या पाणी योजनेसाठी मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लंके यांनी दिला.
पारनेर नगरपंचायतीने दीपक पठारे यांना दिलेल्या पत्रात पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आल्याचे नमूद केले आहे. अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या कार्यालयाकडून योजनेबाबत आवश्यक माहिती व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. त्यानुसार नगरपंचायतीने सविस्तर प्रकल्प अहवाल, तांत्रिक मंजुरी, पाणी आरक्षणासंबंधी कागदपत्रे आणि इतर आवश्यक अभिलेख शासनाकडे सादर केल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. योजनेबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा नगरपंचायतीने व्यक्त केली आहे. तसेच पाणीपुरवठा योजना मंजुरीची फाइल कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे, याबाबत दोन दिवसांत माहिती देण्यात येईल, असेही नगरपंचायतीने लेखी आश्वासन दिले आहे.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, चंद्रकांत कावरे, रा. या. औटी, नीलेश खोडदे, डॉ. बाळासाहेब कावरे, योगेश मते, उपनगराध्यक्षा प्रियांका शिंदे, अर्जुन भालेकर, दीपक नाईक, प्रकाश दरेकर, दीपक पठारे, भूषण शेलार, रुपेश ढवण, सतीश म्हस्के, बाळासाहेब शेटे, भाऊसाहेब पठारे, आनंद औटी, बाळासाहेब शेरकर, रायभान औटी, डॉ. सचिन औटी, सहदेव तराळ आदी उपस्थित होते.
