सुशील थोरात हल्लाप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची कठोर कारवाईची मागणी
पारनेर / प्रतिनिधी : अहिल्यानगरचे साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पारनेर पोलीस स्टेशनला देण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत असलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून, पत्रकारांनी निर्भीडपणे बातमीदारी करणे आवश्यक आहे. पत्रकार सुशील थोरात यांनी अवैध व्यवसायासंदर्भात बातमी केल्याच्या कारणातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. २० ऑगस्ट २०२६) सायंकाळी पाईपलाईन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर किरकोळ वादातून सुशील थोरात व त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही सुदैवाने बचावले.
दरम्यान, पत्रकारांनी दिलेले निवेदन स्वीकारल्यानंतर पारनेर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे आणि पीएसआय रणजीत मारग यांनी हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासोबतच भविष्यात पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत, यासाठी दक्षता घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पारनेर तालुकाध्यक्ष संतोष तांबे, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, पारनेर शहराध्यक्ष भगवानराव गायकवाड यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“पत्रकारांना कोणीही एकटे समजू नये; संरक्षणासाठी रस्त्यावर उतरू!”
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले, “पत्रकाराला जात-धर्म नसतो. तो प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतो. आज सुशील थोरात यांच्यावर हल्ला झाला, उद्या दुसऱ्या पत्रकारावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांच्या पाठीशी कोणीही नाही, असे कोणी समजू नये. पत्रकारांवरील हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. पत्रकारांच्या संरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू.”
हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कलमे लावावीत तसेच हल्लेखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
– दत्ता गाडगे
उत्तर विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी”
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत, पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
– विनोद गायकवाड, जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, डिजिटल मीडिया, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“पत्रकारांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई होणे गरजेचे”…
“पत्रकार समाजातील प्रश्न आणि अन्याय निर्भीडपणे मांडण्याचे काम करतात. मात्र, बातमीदारीच्या कारणातून पत्रकारांवरच हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन हल्लेखोरांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.”
“पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी प्रशासनाने पत्रकारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. भविष्यात पत्रकारांवर हल्ला करण्याचे धाडस कोणालाही होऊ नये, यासाठी हल्लेखोरांवर कठोर कारवाईचा ठोस संदेश जाणे आवश्यक आहे,” अशी मागणी संतोष तांबे यांनी केली.
– संतोष तांबे,
तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पारनेर.
