पारनेर/प्रतिनिधी : 
  माळकुप ग्रामपंचायत (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने १४व्या, १५व्या वित्त आयोग, मनरेगा आणि कंपनी कर वसुलीच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप उपसरपंच राहुल सुधाकर घंगाळे यांनी केला होता. याबाबत त्यांनी २० जून २०२५ रोजी पंचायत समिती, पारनेर येथे तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी ३० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपसरपंचांनी उपोषण मागे घेतले. येत्या 15 जुलै 2025 पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने उपसरपंच राहुल घंगाळे यांना देण्यात आले. 
 घंगाळे यांनी तक्रारीत म्हटले होते की, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी शासकीय निधीचा गैरवापर केला असून, याबाबत पंचायत समितीकडे तक्रार करूनही कोणतीही चौकशी किंवा माहिती मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजाने आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. उपोषणादरम्यान त्यांच्या जिवीतास काही बरे-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी नमूद केले होते.पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी १७ जून २०२५ रोजीच्या पत्रान्वये विस्तार अधिकारी एस.एस. जगताप यांना तक्रारीच्या मुद्द्यांवर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. उपसरपंचांच्या उपोषणानंतर प्रशासनाने तातडीने चर्चा करून लेखी आश्वासन दिले की, चौकशी पूर्ण करून नियमानुसार उचित कार्यवाही केली जाईल. यामुळे घंगाळे यांनी उपोषण मागे घेतले.विस्तार अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माळकुप ग्रामपंचायतीतील या कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, चौकशीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या या आश्वासनामुळे तूर्तास तणाव निवळला असला, तरी याप्रकरणी पुढील कार्यवाही काय होते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
माळकुप ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी अपहार केला या विरोधात मी उपोषणाला बसलो परंतु प्रशासनाने येत्या 15 जुलै पर्यंत चौकशी अहवाल देऊ असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले आहे अहवाल प्राप्त न झाल्यास पुन्हा उपोषण करणार आहे. 
राहुल घंगाळे (उपसरपंच, माळकुप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version