पारनेर / भगवान गायकवाड, 
    वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. मात्र, पारनेर शहरातील चेडे मळा येथील ‘शेतकरी महिला ग्रुप’च्या भगिनींनी यावर्षी शहरातील संगमेश्वर देवस्थान घाट परिसरात वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करण्याचा एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी मार्ग निवडला. केवळ वडाची पूजा न करता, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी या महिलांनी वृक्षारोपणाचा आगळावेगळा उपक्रम राबविला.

   योग शिक्षिका मिरा पुजारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.”भगिनींनी लावावं एक एक झाड, भरपूर मिळेल प्राणवायू, उद्याच्या श्वासांची तरतूद करेल हे झाड”या बोधवाक्याचा आधार घेत, या ग्रुपमधील महिलांनी एक वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. वडाचे झाड हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वाढते प्रदूषण आणि कमी होणारी हरितपट्ट्याची व्याप्ती पाहता, केवळ पूजा करून न थांबता, प्रत्यक्ष झाड लावून त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे, हेच या महिलांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
चेडे मळा येथील वैशाली औटी, वंदना चेडे, पूजा गाडगे, पुष्पा औटी, रुपाली चेडे, पल्लवी गंधाडे, राहिबाई गंधाडे, स्वप्नाली चेडे, मंगल औटी, सविता पुजारी, ताराबाई औटी शेतकरी महिलांच्या या उपक्रमामुळे वटपौर्णिमेच्या सणाला एक नवा सामाजिक आणि पर्यावरणपूरक अर्थ प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की, वडाच्या झाडाची पूजा करणे ही आपली संस्कृती आहे, परंतु आजच्या काळात झाड लावणे आणि ते जगवणे ही आपल्या भावी पिढीसाठी दिलेली सर्वोत्तम भेट ठरेल. या झाडांमुळेच उद्याची हवा शुद्ध राहील आणि निसर्ग समृद्ध होईल.

शेतकरी महिला ग्रुपच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करून महिलांनी लावलेली ही झाडे भविष्यात मोठी होऊन एक नैसर्गिक कवच म्हणून काम करतील, यात शंका नाही. पारनेरसारख्या शहरात महिलांनी पुढाकार घेऊन राबवलेला हा उपक्रम इतर महिलांसाठी आणि समाजासाठी एक आदर्शवत उदाहरण ठरला आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version