अहिल्यानगर I प्रतिनिधी,
नगर–पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण गावाजवळील चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दि. १६ जुलै २०२६ रोजी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर सुपा पोलीस ठाण्यात सुमारे ५० ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके व समस्त नारायणगव्हाण ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर–पुणे महामार्गावरील अपूर्ण व धोकादायक रस्त्यामुळे गेल्या काही दिवसांत वारंवार अपघात होत असून अनेक युवक गंभीर जखमी झाले आहेत. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. भरधाव वाहने रस्त्यालगतच्या घरांमध्ये घुसल्याने मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
या प्रश्नाबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
अपघातांना जबाबदार असलेल्या संबंधित विभागांसह पी डब्लु डी अधिकारी व काम न करता टोल वसुली करणाऱ्या चेतक एन्टंर प्रायजेस कंत्राटदारांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत तसेच सुपा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेऊन आंदोलनकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके तसेच नारायणगव्हाण ग्रामस्थ उपस्थित होते.
