विद्यार्थ्यांना सुजित झावरे पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन; माणुसकी आणि सेवाभाव जपण्याचे आवाहन
मेडगाईड एज्युकेशनच्या वतीने डॉ. मृणाल गागरे व पल्लवी गागरे यांच्या पुढाकारातून विद्यार्थी विशेष सत्कार सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला. यावेळी प्रमुख पाहुणे सुजित झावरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय क्षेत्रातील यशाबरोबरच माणुसकी, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि रुग्णांप्रती संवेदनशीलता जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
डॉक्टर होणे म्हणजे केवळ पदवी संपादन करणे नसून रुग्णांची सेवा आणि समाजाप्रती आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे होय. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ही त्यांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात असून भविष्यात उत्कृष्ट डॉक्टर बनून समाजाच्या सेवेसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाली.
या प्रसंगी मेडगाईड एज्युकेशनच्या वतीने सुजित झावरे पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याला प्रेरणा देणारा हा सोहळा उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
“मेडगाईड एज्युकेशनच्या माध्यमातून भविष्यात अनेक होतकरू विद्यार्थी डॉक्टर बनून समाजाच्या सेवेत योगदान देतील, असा मला ठाम विश्वास आहे. ही संस्था केवळ डॉक्टर घडविण्याचे काम करत नसून, समाजाला संवेदनशील, सेवाभावी आणि कर्तव्यदक्ष वैद्यकीय तज्ज्ञ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. या संस्थेतून घडणारे डॉक्टर भविष्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात निश्चितच आपला ठसा उमटवतील.”
— सुजित झावरे पाटील, शिवसेना नेते / माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अहिल्यानगर.
