पारनेर / भगवान गायकवाड, 
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा (विठ्ठलवाडी) येथील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी, विठ्ठलवाडी येथे अधिकृत बस थांबा सुरू करावा आणि सकाळी ८:३० च्या सुमारास बसची वेळ निश्चित करावी, या मागणीचे निवेदन समस्त ग्रामस्थांच्या वतीने पारनेर आगार प्रमुख प्रशांत काळे यांना देण्यात आले.

     पारनेर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भोयरे गांगर्डा परिसरात मोठी आहे. यामध्ये विशेषतः रसाळवाडी आणि विठ्ठलवाडी येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. सद्यस्थितीत पारनेर ते पिंपरी जलसेन आणि पारनेर ते पाडळी रांजणगाव या मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस भोयरे गांगर्डा गावातून ये-जा करतात. मात्र, गावातील मुख्य बसस्थानक आणि विठ्ठलवाडी/रसाळवाडी यांमधील अंतर सुमारे एक किलोमीटर आहे.

सायंकाळी सात वाजता बस गावात आल्यानंतर, विठ्ठलवाडीच्या विद्यार्थ्यांना मुख्य बसस्थानकावर उतरावे लागते. तिथून पुढे एक किलोमीटरचा रस्ता अंधारात तुडवावा लागतो. यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विठ्ठलवाडी येथे बसला थांबा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
 विठ्ठलवाडी येथे तातडीने अधिकृत बस थांबा मंजूर करण्यात यावा.सकाळी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी बसची वेळ सकाळी ८:३० वाजताची करावी.पारनेर ते पिंपरी जलसेन आणि पाडळी रांजणगाव या दोन्ही मार्गावरील बसेसला येथे थांबा द्यावा. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आणि मुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी हा थांबा तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. आगार प्रमुखांनी यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आमची विनंती आहे.” ग्रामस्थ, भोयरे गांगर्डा यांनी केली आहे.

या निवेदनामुळे आता एसटी प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 या मार्गावरील एक संबंधित महिला वाहक फक्त हि बस सकाळी ८.१५ वाजताच भोयरे गांगर्डा थांब्यावरून घेऊन जात असल्याने विद्यालयीन विद्यार्थ्यांचे बस हुकण्याचे प्रमाण वाढत आहे त्या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आगार प्रमुख यांनी या महिला वाहकास सूचित करणे आवश्यक आहे.
         एका विद्यार्थिनीचे पालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version