समाज, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाचा दृढ संकल्प

पारनेर, भगवान गायकवाड, 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पारनेर येथे युनिटी ऑफ मुलनिवासी समाज आणि सावित्री फातिमा सदभावना मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एका महत्त्वपूर्ण अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही अभिवादन सभा शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पारनेर येथे संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिटी ऑफ मुलनिवासी समाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर हे असणार आहेत. सभेतील प्रमुख वक्ते म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद हे मार्गदर्शन करतील. त्यांच्यासोबत सावित्री फातिमा सदभावना मंचचे मारुती शेरकर (सर), सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पातारे, संविधान चळवळीचे माही सूर्यवंशी, हे देखील उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करणार आहेत.

सभेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वपूर्ण संदेशाचे पुनरुच्चारण करण्यात येणार आहे. संयोजकांनी नागरिकांना आवाहन करताना बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे “पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योग/व्यवसाय करा, कामधंदा करा, नोकरी करा. परंतु पोटाचा प्रश्न सुटल्यावर गाडी, बंगला आणि कुटुंब यातच अडकून राहु नका. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, हे लक्षात घेऊन समाजासाठी समयदान, धनदान किंवा श्रमदान यापैकी जमेल ते योगदान द्या.”
यावेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाजाप्रती असलेले समर्पण अधोरेखित करण्यात आले.
मी जर ठरवलं असतं, तर मी जगातली सर्वात मोठी नोकरी केली असती, अमाप संपत्ती आणि पैसा गोळा केला असता, पण मी अगोदर समाजाचा विचार केला आणि समाजासाठीच प्राण पणाला लावले…! “सध्या देशात असलेली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाचे तंतोतंत पालन करणे किती अनिवार्य झाले आहे, यावर सभेमध्ये विशेष भर दिला जाणार आहे. त्यांना ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना उपस्थित सर्व नागरिकांना लोकशाही आणि संविधानाच्या सन्मान, सुरक्षा व संवर्धन करण्याचा दृढ संकल्प करण्याची आवश्यकता संयोजकांनी व्यक्त केली आहे.या अभिवादन सभेला यशस्वी करण्यासाठी बहुजन समविचारी संघटनां, ज्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, अविनाश पारखपद मंडळ, भारतीय बौद्ध महासभा व पारनेरमधील सर्व पुरोगामी संघटनांनी सहकार्य केले आहे. पारनेर तालुक्यातील सर्व उपासक व उपासिका तसेच पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभिवादन सभेला उपस्थित राहून महामानवाला आदरांजली वाहावी, असे कळकळीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version