केडगाव / भगवान गायकवाड,
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असताना, केडगाव येथील आहारतज्ञ आणि योग प्रशिक्षक ज्योती येनारे यांनी आपल्या असामान्य योगसाधनेने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केवळ २ तासांच्या कालावधीत ७०१ सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा विक्रम साधत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सूर्यनमस्कार हा केवळ एक शारीरिक व्यायाम नसून, तो शरीर, मन आणि श्वास यांच्यातील समतोल साधणारी एक संपूर्ण साधना मानली जाते. एकापाठोपाठ ७०१ सूर्यनमस्कार पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रचंड शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि दृढ इच्छाशक्ती यांचे प्रदर्शन ज्योती येनारे यांनी यावेळी घडविले.
ज्योती येनारे या गेली १० वर्षे केडगाव येथील राधा कृष्णा क्लिनिकमध्ये आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तर गेल्या ३ वर्षांपासून ‘Jyotii’s Yoga Studio’ च्या माध्यमातून त्या योग प्रशिक्षक आणि परीक्षक म्हणून सेवा देत आहेत. स्वतःचे व्यावसायिक आयुष्य, घरातील जबाबदाऱ्या आणि नियमित योगाभ्यास यांचा उत्तम समतोल राखत, त्यांनी हा टप्पा गाठला आहे. त्यांच्या मते, नियमित प्राणायाम, ध्यान आणि योग्य आहारशैली हेच निरोगी जीवनाचे खरे गमक आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे योगाभ्यास करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः महिलांसाठी ही कामगिरी अत्यंत प्रेरणादायी ठरत असून, “इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अशक्य असे काहीही नाही,” हा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून आणि योगप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ज्योती येनारे यांचे हे यश केवळ त्यांच्या मेहनतीचे फळ नसून, ते निरोगी जीवनशैलीसाठी समाजाला दिलेली एक मोठी प्रेरणा आहे.
