पारनेर / भगवान गायकवाड,
वनकुटे( ता.पारनेर) ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक (दलित वस्ती) सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीत मोठा अपहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या बाबतचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसुळे यांच्याकडे ग्रामस्थ संतोष केदारी यांनी दिले आहेत.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास येत्या १६ फेब्रुवारी २०२६ पासून पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ६३ नागरिकांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत भीम नगर वस्तीच्या नावाखाली बँक स्टेटमेंटवरून लाखो रुपये काढण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात वस्तीमध्ये कोणतीही कामे झालेली नाहीत. केवळ कागदावर बोगस बिले आणि एम.बी. (मोजमाप पुस्तिका) तयार करून हा निधी हडप करण्यात आल्याचा आरोप होत आहे.१५ व्या वित्त आयोगातून भीम नगरमध्ये एलईडी लाईट बसवण्यासाठी २ लाख ५७ हजार २५८ रुपये खर्च झाल्याचे ऑनलाइन दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तीत एकही नवीन दिवा बसवलेला नाही. या संदर्भात बँक स्टेटमेंट आणि ऑनलाइन बिलांचे पुरावे गट विकास अधिकारी पारनेर यांना सादर करण्यात आले आहेत.
येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास १६ फेब्रुवारी रोजी सामूहिक उपोषण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. या तक्रारीमुळे पारनेर तालुक्यात खळबळ माजली असून प्रशासकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर संतोष बबन केदारी, दिपक भाऊसाहेब खामकर, संदेश दगडू केदारी, पोपट रघुनाथ खैरे, साजन बबन साळवे, सुदाम दामू केदारी सह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.
