आध्यात्मिक दिनदर्शिका २०२६ चे पारनेरमध्ये लोकार्पण.
पारनेर / भगवान गायकवाड,
धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानवाला खऱ्या सुखाचा शोध घ्यायचा असेल, तर अध्यात्म हाच एकमेव मार्ग आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून शिकवले जाणारे ‘राजयोग मेडिटेशन’ हे मनाला निश्चितच शांती देणारे असून, विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन पारनेर तालुका वकील संघटनेच्या माजी उपाध्यक्षा ॲड. भारती तराळ यांनी केले.
पारनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘आध्यात्मिक दिनदर्शिका २०२६’ च्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मकुमारी केंद्राच्या वतीने अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालनाने झाली. यावेळी मंचावर केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी साधना दिदी, ज्येष्ठ साधक रामभाई तसेच इतर भाई आणि माताजी उपस्थित होत्या. ॲड. भारती तराळ यांच्या शुभहस्ते नवीन वर्षाच्या आध्यात्मिक दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना साधना दिदी यांनी केंद्रात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “ब्रह्मकुमारी केंद्र हे केवळ धार्मिक केंद्र नसून ते मानवी मूल्ये आणि चारित्र्य घडवण्याचे एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. येथे केवळ ध्यानधारणाच शिकवली जात नाही, तर मनुष्याला आपल्या आंतरिक शक्तीची ओळख करून दिली जाते. समाजातील प्रत्येक घटकाने दिवसातील काही वेळ स्वतःसाठी आणि ईश्वरीय स्मृतीसाठी काढला, तर जीवनातील अर्ध्याहून अधिक समस्या दूर होऊ शकतात.”
ॲड. भारती तराळ यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, वकिलीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात काम करताना मानसिक संतुलन राखणे अत्यंत गरजेचे असते. राजयोगाच्या अभ्यासाने मनाची एकाग्रता वाढते आणि कठीण प्रसंगातही संयम राखण्याची शक्ती मिळते. या केंद्राने प्रकाशित केलेली दिनदर्शिका घरोघरी पोहोचल्यास त्यातील सुविचारांमुळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. या सोहळ्यासाठी पारनेर परिसरातील अनेक नागरिक आणि ब्रह्मकुमारी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले.
चौकट…धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता लाभावी आणि समाजाला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढता यावे, यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या वतीने विविध मोफत कोर्सेसचे अध्ययन केले जाते. दैनंदिन कामाचा ताण कसा व्यवस्थापित करावा. आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याचे मार्गदर्शन. मद्यपान, धूम्रपान, व इतर वाईट सवयींपासून मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक आणि मानसिक बळ देणारे कोर्सेस. मनाला एकाग्र करण्यासाठी आणि आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी राजयोग ध्यानधारणा शिकवली जाते.जीवनाचे आध्यात्मिक रहस्य उलगडणारी अभ्यासपूर्ण प्रवचने.
पारनेर केंद्रात हे सर्व कोर्सेस मोफत आहेत. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले जीवन आनंदी व व्यसनमुक्त करावे.
– साधना दिदी.
संचालिका, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र
