पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर ग्रामीण रुग्णालयातील जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी विभागातून नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी लागणारे जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणीचे डिजिटल दाखले मिळत नसल्याने नागरिकांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसापूर्वी पारनेर नगर पंचायत कडून जन्म, मृत्यू , विवाह नोंदणीचे ऑफलाईन दाखले मिळत होते पण कालांतराने हे दाखले पारनेर ग्रामीण रुग्णालयातील जन्म मृत्यू व विवाह नोंदणी विभागात मिळू लागले. पारनेर शहरातील बहुतांश नागरिकांना जन्म मृत्यू, विवाह नोंदणीचे दाखल्याची प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यकता असते पण गेली कित्येक वर्षापासून नागरिकांना ग्रामीण या विभागातून सेवा उपलब्ध होत नाही. एखादा नागरिक डिजिटल दाखले मिळवण्यासाठी या विभागात गेल्यास तेथील कर्मचारी सांगतात की आपले सरकार किंवा महा ऑनलाइन सारख्या अधिकृत वेबसाइट आमच्याकडे अजून कार्यान्वित नाहीत त्या मुळे आम्ही नागरिकांना मागणी असलेले डिजिटल दाखले देऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी समस्या निर्माण झाली आहे. पारनेर नगरपंचायतला देखील नागरिकांच्या या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा केली असता आम्ही मासिक मीटिंग मध्ये नागरिकांच्या समस्या बाबत विषय घेतला आहे. पण वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतले जात नसल्याचे सांगितले जात आहे. त्या मुळे नागरिकांना डिजिटल दाखले मिळवण्यासाठी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न पडत आहे. लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांना डिजिटल दाखल्याची ऑनलाईन वेबसाइट सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकारी यांच्याशी मीटिंग घडून समस्या सोडवण्याची मागणी पारनेर शहरातील नागरिक करत आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर नगर पंचायत विभागाकडे आता जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणीचे दाखले मिळत नाहीत त्या साठी आता पारनेर ग्रामीण रुग्णालयातील विभागात दाखले उपलब्ध होत आहेत. पण हे दाखले डिजिटल दाखले मिळत नाहीत . नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पारनेर नगर पंचायतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांना लवकरच देणार आहोत आणि पारनेर शहरातील नागरिकांच्या या समस्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत.
– योगेश मते
सभापती, पाणी पुरवठा, पारनेर नगर पंचायत.
🔶🔶🔶🔶🔶🔶
माझ्या कुटुंबियांना मक्का मदिना या धार्मिक स्थळ येथे घेऊन जायचे आहे .त्या साठी मला विवाह नोंदणीचे डिजिटल दाखले आवश्यक आहे पण ग्रामीण रुग्णालयात ऑनलाइन वेबसाइट नसल्याने ते मिळत नाही त्या मुळे मला अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर डिजिटल दाखले मिळवण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
– रमीज राजे, ग्रामस्थ.
