पारनेर / ता. प्रतिनिधी,  

पारनेर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या गारखिंडी ते अळकुटी ते पाबळ ते निघोज मार्गावरील पुलांसह डिकसळ – जामगाव मार्गावरील पुलाच्या बांधकामाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तब्बल ७ कोटी ६८ लाख ३३ हजार रुपयांची मंजुरी मिळाली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यकाळापासून प्रलंबित असलेल्या या कामांसाठी पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे.

या संदर्भात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते सर यांनी मंत्रालय, मुंबई येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन संबंधित कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या दि. १३ जुलै २०२६ रोजीच्या मंजुरी पत्रानुसार पारनेर तालुक्यातील या तीन पुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मंजूर कामांमध्ये डिकसळ ते जामगाव रस्त्यावरील चेनज ४+२५० येथे पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपये, गारखिंडी ते अळकुटी ते पाबळ ते निघोज रस्त्यावरील चेनज ०+७०० येथे पुलासाठी २ कोटी ८४ लाख ७५ हजार रुपये, तर याच मार्गावरील चेनज १+२०० येथे पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी १७ लाख १६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या तिन्ही कामांची एकूण मंजूर किंमत ७ कोटी ६८ लाख ३३ हजार रुपये इतकी आहे.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या पुलांची गरज लक्षात घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून कामे मंजूर होण्यासाठी केलेल्या प्रारंभिक पाठपुराव्याला आमदार काशिनाथ दाते सरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळाली. आमदार दाते यांनी विधानसभेचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित कामांचा सातत्याने पाठपुरावा करत ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामांना आता प्रत्यक्ष मंजुरी मिळाली आहे.

या मंजुरीबद्दल आमदार काशिनाथ दाते सर यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे विशेष आभार मानले आहेत.

“पारनेरच्या ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करणे आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावणे ही आपली प्राथमिकता आहे. या तीन पुलांच्या मंजुरीमुळे संबंधित परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून, पुढील काळातही मतदारसंघातील आवश्यक विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील,” असा विश्वास आमदार काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केला.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🔸 “मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेले दोन्ही रस्ते पूर्ण झाले; मात्र त्यावरील आवश्यक पुलांची कामे प्रलंबित राहिली होती. या पुलांची गरज लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या कामांना मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारचा ६० टक्के व राज्य सरकारचा ४० टक्के निधी मिळून ही कामे पूर्ण होणार असून, यामुळे परिसरातील नागरिकांचे दळणवळण अधिक सुरक्षित व सुरळीत होईल.”

– आमदार काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version