शौर्याचे स्मरण… कारगिल विजय दिनानिमित्त नवनागापूर येथे अभिवादन समारंभ
पारनेर (प्रतिनिधी) :
कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची आठवण जागविन्याच्या उद्देशाने आज शनिवार दि.२६ जुलै २०२५ रोजी नवनागापूर,अहिल्यानगर येथे वीर सैनिक बहुउद्देशीय संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणाऱ्या या कार्यक्रमास पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर उपस्थित होते.
यावेळी आमदार दाते यांनी सांगितले की, कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कारगिल विजय दिवस’ देशभरात साजरा करण्यात येतो. याच दिवशी भारतीय सैन्याच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरित परिस्थितीत शत्रूसैन्याला नामोहरम केले. कारगिलच्या शहिदांचे सन्मानाने स्मरण करण्याबरोबरच, देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो. देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने नवनागापूर येथे कृतज्ञतेची भावना जागवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ही अभिमानाची बाब आहे. भारतीय सैन्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक असून त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
उपस्थित सर्व आजी-माजी सैनिक व नागरिकानी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आमदार दाते यांनी शहीद जवानांच्या स्मारकासाठी ५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देत कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले. शौर्य, बलिदान आणि देशभक्ती यांची अमर कथा म्हणजेच कारगिल विजय दिवस असून हा दिवस संपूर्ण देशबांधवांसाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञ राहणे हे एक भारतीय नागरिक म्हणुन प्रत्येकाचे आद्यकर्तव्य असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार दाते सरांसमवेत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे एपीआय माणिक चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, माजी जि.प. सदस्य वसंत चेडे, उद्योजक दिलीपशेठ दाते, बंडूनाना सप्रे, विजयराव शेवाळे, सागर सप्रे, नरेश शेळके, दत्ता सप्रे, राम घाडगे यांसह सर्व आजी-माजी सैनिक व नवनागापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
