नांदूरमध्ये रक्षाबंधन सोहळ्याचा हृदयस्पर्शी अनुभव
पारनेर/प्रतिनिधी :
राखीचा सण म्हणजे प्रेम, जिव्हाळा, नात्यांची जपवणूक आणि सुरक्षा देण्याचं वचन. हा पारंपारिक सण साजरा करताना नांदूरचे मा. सरपंच तथा नीलेश लंके प्रतिष्ठाचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी एक वेगळा,हृदयस्पर्शी आणि समाजाशी नातं दृढ करणारा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला.
रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी राजदेव यांनी गावातील आणि गावाबाहेर लग्न करून गेलेल्या सर्व भगिनींसाठी सार्वजनिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले. हा उपक्रम केवळ औपचारिकता नव्हती तर त्यामागे संपूर्ण गावाचा भावनिक एकोप्याचा धागा जपण्याची भूमिका होती.
सकाळपासूनच गावात एक उत्साही आणि सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. गावातील सभागृहात उत्साहात हा भावनिक कार्यक्रम पार पडला. गावाच्या कानाकोपऱ्यातून आणि लग्न होउन दुरदूर गेलेल्या भगिनीही मोठया आनंदाने या सोहळयासाठी उपस्थित होत्या.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
शेकडोंनी बांधल्या राख्या, हात नव्हे, प्रेमाचं आकाश
या सोहळ्यात शेकडोंच्या संख्येने आलेल्या भगिनींनी राजदेव यांना राखी बांधली. एक-एक राखी बांधताना प्रत्येक बहिणीच्या डोळयांत प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेच्या भावना स्पष्ट जाणवत होत्या. पाहता पाहता राजदेव यांचे दोन्ही हात राख्यांनी सजले. जणू प्रेमाचं एक अनमोल कवचच त्यांच्या हातावर उतरलं. राखी बांधणं हा केवळ रिवाज नसतो. तो एक भावनात्मक ॠणानुबंध असतो. हा बंध उभा राहता ज्या आत्मियतेने भगिनींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्याने उपस्थितांचे डोळेही पाणावले.
🔶🔶🔶🔶🔶🔶
सामाजिक लढ्याचा निर्धार असलेला नेता
रविंद्र राजदेव हे केवळ गावाचे मा. सरपंच नाहीत तर खा. नीलेश लंके यांचे खंदे शिष्य आणि समाजाभिमुख कार्यकर्ते आहेत. महसूल विभागाच्या विविध शासकीय कामकाजामध्ये सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या त्रासाविरूध्द त्यांनी अनेकदा आवाज उठविला आहे. नागरिकांना त्यांच्या गावातच उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, वारसाहक्क दाखले मिळावेत म्हणून विशेष शिबिरांचे आयोजन त्यांनी केले. वृध्दांना मिळणाऱ्या शासकीय मानधनात आलेला अडथळा लक्षात आल्यावर त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर महसूल विभागाने हे मानधन सुरू करण्यासाठी त्वरीत कार्यवाही केली. त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये माणूस केंद्रित आणि संवेदनशील कार्यपध्दती स्पष्टपणे दिसून येते.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
प्रेमळ भेटवस्तू आणि चेहऱ्यावर हसू
राखी बांधणाऱ्या प्रत्येक भगिनीसाठी राजदेव यांनी खास भेटवस्तूंची व्यवस्था केली होती. एका कुटूंबवत्सल भावासारखी काळजी घेत त्यांनी प्रत्येक बहिणीसाठी भेटवस्तू आणि अल्पोपहाराचे आयोजन केले होते. राखी बांधल्यानंतर त्यांच्या हातात ही प्रेमाची भेट मिळाली, तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान या उपक्रमाच्या यशाचं खऱ्या अर्थाने प्रतीक होतं.
