टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
अचानक आलेल्या चक्री वादळ आणि अवकाळी पावसाने टाकळी ढोकेश्वर परिसरातील वारनवाडी येथील हांडे वाडा वस्तीवर मोठे नुकसान केले आहे. घरांचे छप्पर उडून गेले, विजेचे खांब पडले आणि शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आणि आदिवासी बांधव उघड्यावर आले आहेत.
वारनवाडी येथील आदिवासी वस्तीवर चार ते पाच छप्पराची घरे वादळाने उडून गेली. घरांमध्ये पाणी घुसल्याने धान्य, कपडे आणि इतर घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या टोमॅटो आणि कांदा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कालपासून विजेचे खांब पडल्याने संपूर्ण भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
🔶🔶🔶🔶🔶
तातडीने पंचनाम्याची मागणी…
टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची आणि नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले, “अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे लवकरात लवकर पंचनामे करावेत. पडलेले विजेचे खांब हटवून शेतकरी आणि ग्रामस्थांना तात्काळ वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.”
यावेळी तुकाराम कारंडे, दिलीप डोमाळे, खंडू डोमाळे, नाथा मारुती हांडे, सुनिल डोमाळे, कैलास पवार, दत्तात्रय काळे, प्रकाश हांडे, लक्ष्मण कारंडे, भाऊ कारंडे, शिवाजी केदार, बाळू वाघ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक स्तरावर जोर धरत आहे.
