संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ आर जी सय्यद यांचे लिखाण.

पारनेर / भगवान गायकवाड, 

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. आर. जी. सय्यद लिखित ‘पैगंबरी शृंखला आणि संतांचे सामाजिक योगदान’ या महत्त्वपूर्ण साहित्याचे प्रकाशन नुकतेच श्रीगोंदा येथील संत शेख महमंद महाराज यांच्या दर्गा प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. ह.भ.प. सोपान काका औटी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संभाजीराव बोरुडे, ह.भ.प. पवार मामा, ह.भ.प. यासीन भाई, ह.भ.प. गुलाब भाई तांबोळी, मुकुंदराव सोनटक्के, ह.भ.प. लांडगे महाराज, ह.भ.प. दांडेकर महाराज, सामाजिक कार्यकर्ते बापू माने, विणेकरी तराळ यांच्यासह परिसरातील समस्त वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     डॉ. आ. ह. साळुंखे यांनी या साहित्याची प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. साळुंखे आपल्या मनोगतात म्हणतात की, “अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरचे रहिवासी असलेले डॉ. रफिक सय्यद यांचा इस्लाम आणि पवित्र कुराण यांचा जसा गाढा व्यासंग आहे, तसाच वारकरी संतांचा आणि विशेषतः संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे. इस्लाममधील मुहंमद पैगंबर यांच्या चरित्रातील प्रभावी घटना आणि संत तुकारामांचे अभंग यातील समान विचारसूत्रे त्यांनी या पुस्तकात मांडली आहेत. समाजात वैचारिक आणि भावनिक समन्वय साधण्याच्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”या पुस्तकाचे कौतुक अनेक नामवंत विचारवंतांनी केले आहे. मारुती शेरकर (मिशन माणुसकी, मुंबई), कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ), डॉ. बरकतुल्ला खाजा नाजीमोद्दीन (नांदेड) आणि डॉ. हरीश शेळके (मराठी विभाग प्रमुख, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर) यांनी या लेखनावर महत्त्वपूर्ण अभिप्राय नोंदवले आहेत. हे साहित्य धार्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा समन्वय साधणारे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुस्तकाविषयी बोलताना लेखक डॉ. आर. जी. सय्यद यांनी सांगितले की, “आदर्श समाज निर्मितीसाठी आदर्श साहित्याची भूमिका अत्यावश्यक आहे. आपल्या देशाला, विशेषतः महाराष्ट्राला संत आणि सूफी परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. हे साहित्य केवळ मानवी नीती मूल्यांची जोपासना करत नाही, तर विविध धर्मीयांना बंधुत्वाच्या धाग्यात बांधून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यास मदत करते. महापुरुषांचे हे विचार साध्या-सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.”
विविध धर्मांतील समान विचारांची मांडणी आणि त्यातून निर्माण होणारा सलोखा यामुळे या पुस्तकाचे सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. डॉ. सय्यद यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version