पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज प्रश्नावरून आता जनक्षोभ उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असूनही ‘आरडीएसएस’ (RDSS) योजनेतील सिंगल फेज वीज कनेक्शन मिळत नसल्याने, उद्या सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी टाकळी ढोकेश्वर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी या आंदोलनाचे जाहीर आवाहन करत महावितरण प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे.
लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासाठी आरडीएसएस योजनेतंर्गत महत्त्वाची कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अधिकृत वीज कनेक्शन मिळालेले नाही. हक्काची वीज मिळवण्यासाठी शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत, परंतु त्यांना केवळ आश्वासनांशिवाय काहीही मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत आता संपला असून सरपंच प्रकाश गाजरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या आंदोलनाबाबत अधिक माहिती देताना गाजरे यांनी सांगितले की, ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप कनेक्शन मिळाले नाही, त्यांनी उद्या सकाळी १०:३० वाजता टाकळी ढोकेश्वर येथील उपअभियंता कार्यालयावर उपस्थित राहावे. जर उद्याच्या उद्या काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन मिळाले नाही आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देऊन कार्यालयाला टाळे ठोकले जाईल. हे ‘टाळेबंद’ आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच धावपळ उडण्याची शक्यता असून, उद्याच्या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version