पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर येथील वनस्पतीशास्त्र विभाग, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने बीजराखी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. बीजराखी कार्यशाळेचे हे द्वितीय वर्ष होते जिथे विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग, चिंचोके, कडुनिंब, बहावा,मोहरी, निलमोहर इत्यादी बिया, कार्डशीट, नैसर्गिक गोंद इत्यादी वापरून बीजराखी तयार केली. रक्षाबंधनाचा सण जवळ येत असताना,पारनेर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे.या राख्या केवळ धाग्यांनी बनवलेल्या नसून, त्यात विविध प्रकारच्या रोपांच्या बिया वापरल्या आहेत.राख्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि इतर न विघटनशील वस्तू पर्यावरणासाठी हानिकारक असतात. ही बाब लक्षात घेऊन, या राख्या बनवण्यासाठी त्यांनी कापूस आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा सण अधिक अर्थपूर्ण झाला असून, पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक नवीन मार्ग समाजाला मिळाला आहे.
“पर्यावरण वाचवण्यासाठी थोडासा प्रयत्न करणे हे कोणतेही प्रयत्न न करण्यापेक्षा कधीही चांगले आहे.बीज राखी वृक्षारोपणासाठी पुन्हा वापरली जाऊ शकते.अशा प्रकारे आपल्या पर्यावरणाचे तसेच सांस्कृतिक वारशाचे रक्षण आपण करू शकतो.
या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी विद्यार्थ्यांचे व संबंधित प्राध्यापकांचे भरभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्यांचा वापर झाल्यानंतर त्या मातीत पेरून झाडं वाढवता येतात, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते.
या संदर्भात बोलताना प्राचार्य डॉ. आहेर म्हणाले, “आपल्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालून हा उपक्रम यशस्वी केला आहे, याचा मला अभिमान आहे. आजच्या काळात पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या बीजराख्यांमुळे सणाला एक वेगळा अर्थ प्राप्त होईल आणि समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल.”
कार्यशाळेचे संयोजन प्रा. प्रांजली बोरुडे यांनी केले. या कार्यशाळेसाठी विभाग प्रमुख डॉ.आर.एन.देशमुख व प्रा. एस एल खपके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमात प्रा.महेश आहेर, प्रा. तुषार चिकणे, प्रा. रिहाना शेख, प्रा. दीप्ती पवार, प्रा. मीनाक्षी वाबळे, प्रा. नम्रता थोरात तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील बर्डे सुभाष, सुरेश बोरुडे व विद्यार्थी सहभागी झाले होते.
