पारनेर / भगवान गायकवाड, 

   पुरोगामी विचार आणि सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या माजी प्राचार्य डॉ. विद्याधर औटी यांना त्यांच्या अतुलनीय शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल सावित्री फातिमा सदभावना मंच परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ.रफिक सय्यद आणि मारुती शेरकर यांच्या हस्ते नुकताच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

      क्रांतदर्शी महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचे कार्य व विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात डॉ. औटी यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. पारनेर तालुक्याच्या विचारवैभवात भर घालणारे डॉ.औटी यांनी अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. विशेषतः महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांसारख्या थोर समाजसुधारकांनी समता, शिक्षण आणि बंधुत्वासाठी केलेल्या संघर्षाचे आणि त्यागाचे महत्त्व त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून आणि लेखनातून प्रभावीपणे मांडले आहे. या तिन्ही क्रांतदर्शी व्यक्तींना एकाच व्यासपीठावर समजावून सांगण्याची त्यांची हातोटी पुरोगामी विचारांना अधिक बळ देणारी ठरली आहे. सद्भावना परिवाराने डॉ. औटी यांच्या कार्याची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान केला. यावेळी बोलताना डॉ.रफिक सय्यद यांनी “डॉ. औटी यांनी पुरोगामी विचारांची मशाल सातत्याने तेवत ठेवली आहे. त्यांचे कार्य आजच्या समाजाला नवी दिशा देणारे आहे,” असे गौरवोद्गार काढले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. औटी यांनी या जीवनगौरवाचा स्वीकार करताना, हा सन्मान म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान असल्याचे नम्रपणे सांगितले. पारनेरच्या भूमीत विचारांची जी मोठी परंपरा आहे, ती अधिक समृद्ध करण्यासाठी आपण यापुढेही कार्यरत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. डॉ. विद्याधर औटी यांना मिळालेल्या या सन्मानामुळे पारनेर तालुक्यातील शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version