पारनेर/प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यातील पळसपुर, काटाळवेढा, म्हसोबा झाप आणि पोखरी परिसरात बिबट्या वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात बिबट्या वाघ नियमित दिसून येत असून, पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीजपुरवठा सुरू असताना शेतकऱ्यांना धोका वाढला आहे. पळसपुर येथे एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या शेतीची कामे जोरात सुरू असताना, या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
या गंभीर समस्येकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत असून, त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना व्हावी, यासाठी पळसपुर येथे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, पळसपुरचे उपसरपंच मनोज शिंदे, सुरेखाताई डोंगरे, पोखरीचे उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार, म्हसोबा झापचे उपसरपंच अशोक आहेर, संगीता जाधव, कातळवेढ्याचे सरपंच पियुष गाजरे, पोपटराव गुंड, अजित भाईक, पांडुरंग आहेर, संदीप गुंजाळ, गणेश वाकळे आणि नामदेव करंजेकर यांनी टाकळी ढोकेश्वर येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकत तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वन विभागाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version