पारनेर तालुक्यातील पतसंस्थांचे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
पतसंस्थांच्या ठेवींना राज्य सरकारकडून संरक्षण मिळाल्यास पतसंस्थांवरील विश्वास वाढेल व पतसंस्था चळवळीला मोठे बळ मिळेल-आमदार काशिनाथ दाते
अहिल्यानगर – पतसंस्थांची चळवळ ही ग्रामीण भागातील आहे.गरजू लोकांना मदत करण्याचे काम पतसंस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळी तालुका असून देखील नोकरी,धंदा व व्यवसाय करण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेले पारनेर येथील रहिवासी पतसंस्थांना बचतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ठेवी देऊन बळ देण्याचे काम करत असतात.
साखर कारखान्यांना अडचण आल्यास राज्य सरकारकडून मदत दिली जाते.परंतु एखादी पतसंस्था अडचणीत आली तर सहकार खात्याकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही.ही मोठी खंत आहे.पतसंस्थांच्या माध्यमातून सहकार खात्याला वेगवेगळ्या प्रकारचा महसूल जमा केला जातो.पतसंस्थांना राज्य सरकारकडून संरक्षण मिळणे गरजेचे आहे. पतसंस्थांच्या ठेवींना राज्य सरकारकडून संरक्षण मिळाल्यास पतसंस्थांवरील विश्वास वाढेल व पतसंस्था चळवळीला मोठे बळ मिळेल.असे प्रतिपादन पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी केले आहे.
नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन,पारनेर तालुका पतसंस्था फेडरेशन जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.याप्रसंगी विशाल दाते(सहाय्यक निबंधक, सहकारी संख्या ता.पारनेर),प्रमुख मार्गदर्शकःमहाराष्ट्र टाज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष काकासाहेव कोयटे, माजी सहनिबंधक तानाजी कवडे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष
वसंतराव कवाद, पारनेर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजी मोरे, पुणे जिल्हा महात्मा फुले ग्रामीण पतसंस्थेचे सोपान भाकरे, निघोज ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष उदय अनभूले आदी उपस्थित होते.
आमदार काशिनाथ दाते पुढे म्हणाले, पतसंस्थांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून पतसंस्थांचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल. पतसंस्था चळवळीत काही अपप्रवृत्तीने राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा फटका अनेक पतसंस्थांना बसला आहे. पतसंस्था चळवळीत काहीही संबंध नसणाऱ्या लोकांनी पतसंस्था बुडीत कसे निघतील. अशा पद्धतीची भूमिका काही नेतृत्व घेत आहेत. ही गोष्ट निषेध करण्यासारखी आहे.सहकार हा राजकारणाचा अड्डा नाही. पतसंस्था बंद पडल्याने संस्थापक व संस्थाचालक राजकारणात विरोध करणार नाही. या विचाराने काही प्रवृत्ती तालुक्यात काम करीत आहेत. राजकारण करीत असताना सहकार क्षेत्रात कधीही राजकारण केले नाही. सहकार क्षेत्रात पतसंस्था चळवळीला बळ मिळण्यासाठी पारनेर तालुक्यात भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काकासाहेब कोयटे म्हणाले, अहिल्या नगर जिल्हा हा सहकाराची पंढरी असलेला जिल्हा आहे. पारनेर तालुक्यातील पतसंस्था चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याने मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. पतसंस्थांना चांगले व्यवस्थापन करण्यासाठी व सहकाराची माहिती होण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेची गरज आहे. तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या ने पतसंस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.आमदार काशीनाथ दाते यांच्या मार्गदर्शनामुळे पतसंस्था चळवळीला मोठे बळ मिळेल. सहकार चळवळीत काशिनाथ दाते यांचे पूर्वीपासूनच योगदान लाभत आहे.
वसंत लोढा म्हणाले, पारनेर तालुका हा नगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका समजला जातो. पारनेर तालुक्यातील पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी वाढत आहेत. तसेच कर्जाचे प्रमाण देखील वाढत आहे. तसेच प्रतिकूल परिस्थिती असून देखील पारनेर येथील पतसंस्थांचा एनपीए बऱ्याच प्रमाणात कमी आहे. तालुक्यातील एक दोन पतसंस्थांनी चुकीचे काम केले असल्याने येथील पतसंस्था चळवळ अडचणीत आली होती. भविष्यात एकही पतसंस्था बंद पडणार नाही अशा पद्धतीच्या संकल्प आमदार काशिनाथ दाते व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या वतीने संकल्प करण्यात आला आहे. पतसंस्थांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पतसंस्थांची प्रशिक्षण कार्यशाळा तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यशाळा प्रत्येक तालुक्यात होत आहे. अहिल्यानगर हा जिल्हा सहकाराचा महामेरू आहे पतसंस्था चळवळीसाठी हा जिल्हा मार्गदर्शक असे काम करीत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण वर्ग घेऊन जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ
महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणार आहे. पारनेर तालुक्याला सहकाराची माहिती असलेले आमदार काशिनाथ दाते यांच्यासारखे नेतृत्व लाभले आहे. पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पतसंस्था चळवळ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी महाराष्ट्रा चळवळीचे नेतृत्व आमदार काशिनाथ दाते यांनी करावे. असे वसंत लोढा यांनी सांगितले आहे.
या प्रशिक्षण शिबिरात सुधारित गुणपत्रिका व माफ दंड आणि CR, ER व संचालकांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या याविषयी माजी सहनिबंधक तानाजी कवडे यांनी मार्गदर्शन केले. कलम 101/ वसुली नियोजन- काकासाहेब कोयटे, ऑडीट व्यवस्थापन-भास्कर बांगर, सायबर सुरक्षा जोखीम व्यवस्थापन व उपाययोजना-सायबर तज्ञ अथर्व भांबुरकर, समारोप प्रसंगी शंका-समाधान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चासत्र संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागीय फेडरेशनचे कार्याध्यक्ष वसंतराव कवाद यांनी केले तर स्वागत व सूत्रसंचालन सुदाम म्हस्के यांनी केले.तर आभार बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके व पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी मानले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करणेसाठी बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्था व पारनेर ग्रामीण पतसंस्था कर्मचारी यांनी सहकार्य केले
