पारनेर / प्रतिनिधी,
कान्हूर पठारसह परिसरातील पिंपरी पठार, विरोली, हत्तलखिंडी, पाडळी दर्या, वेसदरे, जवळा आदी गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिक वैतागले आहेत. कॉल येणे-जाणे किंवा इंटरनेटचा वापर करणे अशक्य झाले असून, संध्याकाळनंतर तर नेटवर्कचा पूर्णपणे अंशही उरलेला नाही. एका फोनसाठी किंवा महत्त्वाच्या मेसेजसाठी ग्रामस्थांना घराबाहेर पडून उंच जागी किंवा ‘नेटवर्क झोन’ शोधावा लागतो.
या समस्येमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा पोलिसांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. ऑनलाइन शिक्षण, वर्क फ्रॉम होम, डिजिटल बँकिंग, सरकारी योजनांचे अर्ज अशा अनेक गोष्टी रखडल्या आहेत. बँकिंग व्यवहारासाठी नागरिकांना दूरवरच्या गावांत जावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे आणि नोकरदारांचे मोठे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे निवेदन सादर केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, संतोष सातपुते यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्वनाथ कोरडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “मोबाईल टॉवर्सची क्षमता वाढवणे, नवीन टॉवर्स उभारणे किंवा संबंधित कंपन्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश देणे अशी कोणतीही उपाययोजना लवकरात लवकर करावी, जेणेकरून या भागातील हजारो नागरिकांना दिलासा मिळेल.”
ग्रामस्थांनीही प्रशासन आणि दूरसंचार कंपन्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
