पारनेर/प्रतिनिधी : 
निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी पारनेर तालुक्यातील तांडा सुधार योजनेसंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांना निवेदन सादर करून तांडा सुधार योजनेच्या प्रस्तावांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजदेव विविध सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे कार्यरत असून, नुकतेच त्यांनी पेमदऱ्यातील कला केंद्राच्या मुद्द्यावरही आक्रमक भूमिका घेत चर्चेत आले होते.
पारनेर तालुक्यातील अनेक गावांमधील ग्रामपंचायतींनी तांडा वस्ती सुधार योजनेसाठी प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. मात्र, आठ महिने उलटूनही या प्रस्तावांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या योजनेंतर्गत तांडा वस्त्यांचा विकास, पायाभूत सुविधा आणि जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजना अपेक्षित आहेत. रविंद्र राजदेव यांनी प्रशासनाला प्रस्ताव त्वरित मंजूर करून अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील सामाजिक प्रश्न पुन्हा चर्चेत आले असून, प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version