अन्यथा तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर-सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना तालुक्यातील जमीन, पाणी आणि वीज उपलब्ध असताना स्थानिक भुमिपुत्रांना रोजगाराच्या संधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात भुमिपुत्रांना न्याय मिळाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रात अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत असून, येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. या कंपन्यांना तालुक्यातील पोषक वातावरणाचा लाभ मिळत असताना स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या जात नसल्याचे तालुकाध्यक्ष उबाळे यांनी निदर्शनास आणले. स्थानिक भुमिपुत्रांमध्ये कौशल्य आणि टॅलेंट असूनही कंपन्या मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे स्थानिक तरुणांवर अन्याय होत असून, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांनी स्थानिकांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात बाहेरील कर्मचाऱ्यांना संधी दिली जात असल्याचे दिसून येते. यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी प्रशासन आणि कंपन्यांना स्थानिक भुमिपुत्रांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, याबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक भुमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढण्याची त्यांची भूमिका स्पष्ट आहे.
