पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत डोंगराळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेला आहे. त्यामुळे येथे रोजगाराच्या संधींची वानवा आहे. आणि मुळातच रोजगार संधी कमी असल्याने विधवा व परित्यक्ता महिलांना कायमच रोजगाराच्या संधी पासून दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे त्यांनी छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करावा हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सदर महिलांना बँक कर्ज उपलब्ध करून देत नाही त्यामुळे सदर महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून 35–38 % दराने तात्पुरत्या स्वरूपाचे कर्ज घेऊन ते परतफेड करत आहेत. सदरच्या महिलांची पठाणी व्याजदराच्या कर्जातून मुक्तता करण्यासाठी, आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून लघुउद्योगाकरता कर्जसहाय्य त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी आपण राष्ट्रीयकृत बँकांना योग्य त्या सूचना द्याव्यात व सदर महिलांच्या शिष्टमंडळाला भेट द्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजप राज्य परिषद सदस्य श्री विश्वनाथ कोरडे म्हणाले की, “तालुक्यातील अनेक महिलांना पतीच्या निधनानंतर किंवा विभक्त झाल्यानंतर अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी योजनांचे सहाय्य मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या संवेदनशील विषयाची दखल घेऊन बँकांना योग्य ते निर्देश द्यावेत, जेणेकरून या महिलांना विनासायास कर्ज मिळून त्या सन्मानाने जगू शकतील.”
