पारनेर शहर वासियांकडून विशेष सत्कार

पारनेर / भगवान गायकवाड, 
देशसेवेची परंपरा जपत पारनेरच्या मातीने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. पारनेर शहरातील महाजन मळा येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यदलात सुभेदार मेजर म्हणून कार्यरत असलेले भास्कर तुकाराम गायकवाड यांच्या दोन्ही पुत्रांनी, प्रसाद आणि प्रकाश गायकवाड यांनी भारतीय सैन्यदलात ‘लेफ्टनंट’ या मानाच्या पदावर नियुक्ती मिळवत कुटुंबासह तालुक्याचा गौरव वाढवला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल पारनेर ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही सुपुत्रांचा विशेष सत्कार करण्यात आला.भास्कर तुकाराम गायकवाड हे गेल्या २८ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात अत्यंत निष्ठेने आपली सेवा बजावत आहेत. वडिलांच्या देशसेवेच्या संस्कारांतून आणि प्रेरणेतून प्रसाद आणि प्रकाश यांनीही सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. एकाच कुटुंबातील वडील सुभेदार मेजर आणि दोन्ही मुले लेफ्टनंट, असा दुर्मिळ योगायोग पारनेर तालुक्यात पहिल्यांदाच घडला आहे. या यशाने गायकवाड कुटुंबावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रसाद आणि प्रकाश यांनी चार वर्षांपूर्वी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथे अत्यंत कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर डेहराडून येथील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमी येथे एक वर्षाचे विशेष लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून कारकीर्द सुरू केली आहे. त्यांच्या या जिद्दीच्या प्रवासाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी तुकाराम गायकवाड, विठ्ठल गायकवाड, तात्याभाऊ गायकवाड, संतोष गायकवाड, माजी नगरसेवक किसनदादा गंधाडे, भरत औटी, उद्योजक नितीन औटी, उद्योजक अशोक औटी, मेजर अप्पा औटी आणि प्रगतशील शेतकरी हरिभाऊ ठाणगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गायकवाड कुटुंबाच्या या देशप्रेमी परंपरेचे कौतुक करत दोन्ही तरुण लेफ्टनंटना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रसाद आणि प्रकाश यांचे यश हे तालुक्यातील तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version