पुणे, 
आळंदी येथे श्रावण महिन्याच्या प्रारंभी १ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळेतील श्रीम. चंद्रकला भीमाशंकर खोल्लम सभागृहात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या भव्य धार्मिक व सांस्कृतिक महोत्सवात दररोज शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन नामस्मरणाचा लाभ घेतला.

सोहळ्याच्या समारोप प्रसंगी संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. विश्वासराव आरोटे यांना दैवज्ञ सुवर्णकार समाजातर्फे ‘संत वारकरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानपत्र, संत तुकाराम महाराज पगडी, वीणा, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच दैनिक समर्थ गांवकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर आणि पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांचाही पुणेरी पगडी, शास्त्रीफळ आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित डॉ. विश्वासराव आरोटे यांनी समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, “नानजीभाईंनी ७० ते ८० हजार मंदिरे उभारली असून, आळंदीच्या इंद्रायणी काठी ३१ कोटी रुपये खर्चून २०० फूट उंच भव्य मंदिर उभारले आहे. दरवर्षी पंढरपूरच्या दिंड्यांना १०० क्विंटल बुंदीचा प्रसाद वाटण्याची सेवा ते निःस्वार्थपणे करतात.” नानजीभाईंच्या दिनचर्येचे वर्णन करताना डॉ. आरोटे म्हणाले, “वयाच्या ८५व्या वर्षीही ते पहाटे साडेतीन वाजता उठून सकाळी आठ वाजता कार्यालयात पोहोचतात. धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन ते सर्वांना मदत करतात. त्यांच्या कार्यात भेदभावाला स्थान नाही.”

या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष संजोक काळदंते, उपाध्यक्ष रविंद्र बेल्हेकर, सचिव तृप्ती टकले, सहसचिव पुष्पा निघोजकर, खजिनदार राहुल निघोजकर, डॉ. विशाल खोल्लम, माजी अध्यक्ष सचिन टकले, विश्वस्त प्रमोद खोल्लम, राजू बेल्हेकर, हेमंतकुमार टकले, विनायक बेदरकर, गणेश बेल्हेकर, सुपर्णा बेल्हेकर, सल्लागार नंदकुमार टकले तसेच आळंदी परिसरातील संतप्रेमी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आठ दिवस चाललेल्या या सोहळ्यात हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, भजन आणि संतवाङ्मय वाचनामुळे आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. नानजीभाई ठक्कर यांची उपस्थिती आणि डॉ. विश्वासराव आरोटे यांचे प्रेरणादायी भाषण यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक भाविक आणि दिंडी क्र. ५४ च्या महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version