पारनेर / भगवान गायकवाड,
मराठी भाषेचे भूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून शनिवार, दि. १४ फेब्रुवारीपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत भांडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतही वाचन चळवळ अधिक दृढ करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष बालसभेने झाली. याप्रसंगी बोलताना शाळेतील शिक्षक बाळासाहेब सालके यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विषद केले. “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा अर्थ सांगताना त्यांनी महापुरुषांच्या जीवनातील उदाहरणे देऊन पुस्तके माणसाची कशी सोबती असतात, हे पटवून दिले.
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि शाळेतील वाचनालय समृद्ध करण्यासाठी मुख्याध्यापक अप्पासाहेब नरवडे यांनी एक स्तुत्य आवाहन केले. त्यांनी गावातील दातृत्ववान व्यक्तींना वाढदिवस, सत्कार समारंभ यांसारख्या कार्यक्रमांवर होणारा अवाजवी खर्च टाळून, त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उपस्थित ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले, ज्यामुळे शाळेत आनंदी आणि शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी सरपंच लताताई भुजबळ, उपसरपंच उमेश खरमाळे, माजी सरपंच अशोकराव खरमाळे, संतोष खरमाळे, प्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर खरमाळे, उपाध्यक्षा सविता भुजबळ, माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष गणेश खरमाळे, उपाध्यक्ष गणेश शेलार, दीपक पवार, मंजाबापू खरमाळे, राहुल खरमाळे, बाळासाहेब खरमाळे, अंगणवाडी सेविका संगीता जाधव, सुनिता कुटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानामुळे गावातील मुलांमध्ये वाचनाची गोडी निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
