पारनेर / प्रतिनिधी,
निघोज येथे पारनेर तालुका बाजार समितीचे माजी सभापती श्री. अरुणराव रामभाऊ ठाणगे यांची शिवसेना (शिंदे गट) पारनेर तालुका प्रमुख पदावर अधिकृत निवड करण्यात आली. ही निवड पारनेर तालुक्यातील पक्षाच्या संघटन बळकटीकरणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
या अधिकृत निवडीचे पत्र देताना आमदार शरददादा सोनवणे, सुजित झावरे पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पक्षाच्या विविध स्तरांवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री. अरुणराव ठाणगे हे पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ नेते असून, ते पारनेर तालुका बाजार समितीचे माजी सभापती आहेत. त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, आगामी काळात विविध स्थानिक मुद्द्यांवर अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुजित झावरे पाटील यांनी या निवडीचे स्वागत करताना पक्षाच्या एकजुटीचे आणि विकासाच्या कामांना गती देण्याचे सूतोवाच केले. आमदार शरद सोनवणे यांनीही पक्षाच्या या निर्णयाचे समर्थन करताना तालुक्यातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.
तेसच अळकुटी गावचे धडाडीचे नेतृत्व सरपंच डॉ.सौ. कोमल संदीप भंडारी यांची शिवसेनेच्या पारनेर महिला तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी अधिकृत निवडीचे पत्र देताना आमदार शरददादा सोनवणे, सुजित झावरे पाटील समवेत जिल्हा व तालुका पदाधिकारी, मान्यवर मंडळी.
या दोन्ही निवडीमुळे पारनेर तालुक्यात शिवसेना चे स्थानिक स्तरावरील नेतृत्व अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
