नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग वरील काँक्रीटीकरणात चिरा, पाणी पुरवठा अपुरा; दर्जा खालावला
परनेर/प्रतिनिधी :
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग वरील काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी केला आहे. कामादरम्यान ट्रॅफिक नियंत्रणासाठी गार्ड किंवा सुरक्षा व्यवस्था नसणे, सूचना फलक नसणे यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. महामार्गावरील काळेवाडी येथे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
टाकळी ढोकेश्वर परिसरात वासुंदे चौक व पारनेर चौक या भागात रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्यावर चिरा पडलेले दिसत आहेत. काँक्रिट टाकल्यानंतर पुरेसे पाणी मारले जात नसल्याने दर्जा खालावत असल्याचा आरोप रविंद्र राजदेव यांनी केला आहे.
टाकळी ढोकेश्वर ही पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास ४० गावांची बाजारपेठ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरातून ग्रामस्थ येत असतात काम सुरू असल्याने वासुंदे चौक व पारनेर चौकात त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक सुद्धा पहावयास मिळत आहे ग्रामस्थांची व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता कामामध्ये वेग गरजेचा असून काम हे चांगल्या दर्जाचे सुद्धा होणे गरजेचे आहे. कामातील निकृष्टता ही धोकादायक असून असे राहिले तर भविष्यात रस्ता लवकर खराब होईल. असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
तसेच, या महामार्गासाठी ज्यांच्या शेतजमिनी गेल्या आहेत, त्यांना नुकसान भरपाई देण्याचे खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना सांगून दोन महिने उलटले तरी प्रशासनाने अद्याप भरपाई दिलेली नाही.
रविंद्र राजदेव यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन दिवसांत कामातील या सर्व त्रुटी दूर करून दर्जा सुधारला नाही, तर निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी टाकळी ढोकेश्वर उपसरपंच रामभाऊ तराळ, महेश झावरे, संपत तराळ, बाळशीराम पायमोडे, संजय खिलारी (मेजर), मळीभाऊ रांधवन, अशोक पायमोडे, अंकुश पायमोडे, विक्रम झावरे, कृष्णा बांडे, विकास आल्हाट आदी उपस्थित होते.
स्थानिकांनी म्हटले आहे की, महामार्गाचे काम विकासासाठी असले तरी सुरक्षा आणि दर्जाकडे दुर्लक्ष केल्यास अपघात वाढतील. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन काम गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन अपरिहार्य असल्याचे संकेत मिळत आहेत.
🔶🔶🔶🔶🔶
महामार्ग विकासाच्या नावाखाली जीवितहानी?
गेल्या वर्षभरापासून नगर कल्याण महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो व या महामार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले असून अनेक अपघात झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. अजूनही काम बरेच बाकी आहे रस्ते बांधकाम विभागाने अपघात न होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली जीवित वाणी होत आहे हे मोठे दुर्दैव आहे. असे मत राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी व्यक्त केले.
🔶🔶🔶🔶🔶
नगर-कल्याण महामार्गाचे वासुंदे चौक व पारनेर चौक या भागात निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे कामामध्ये गती नाही आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत होणारी दिरंगाई चुकीची आहे. काम सुरू असल्यामुळे अपघात होऊन जीव जात असताना प्रशासन झोपलेले आहे. सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन करू. विकासाच्या नावाखाली जीवितहानी होऊ देणार नाही!
– महेश झावरे (टाकळी ढोकेश्वर)
