बालहक्कांसाठी लढणारी स्नेहालय ‘मुक्ती वाहिनी’
बालहक्कांसाठी संवेदनशील, वेगवान आणि प्रभावी हस्तक्षेप
अहिल्यानगर | भगवान गायकवाड,
संकटग्रस्त, शोषित आणि उपेक्षित बालकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनत, स्नेहालय संचलित उडान प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘मुक्ती वाहिनी’ हेल्पलाइनने २०२५- २६ या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी नोंदवत एकूण २७६ बालकांना विविध संकटांतून मुक्त करून सुरक्षित, सन्मानजनक जीवनाची दिशा दिली आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीतच बालहक्क संरक्षणासाठी एक विश्वासार्ह, तात्काळ प्रतिसाद देणारी आणि मानवी संवेदनशीलतेवर आधारलेली मजबूत यंत्रणा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
स्नेहालय संस्था ही मागील ३७ वर्षांपासून अखंडितपणे समाजात कार्यरत असून, महिला आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर काम करत त्यावर प्रभावी उपाययोजना राबवत आली आहे. या दीर्घ अनुभवाच्या भक्कम पायावर उभी राहून ‘मुक्ती वाहिनी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून, आज ती बालकांच्या हक्कांचे रक्षण करणारी एक सक्षम आणि संवेदनशील यंत्रणा ठरली आहे.
गेल्या वर्षभरात ‘मुक्ती वाहिनी’च्या माध्यमातून विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये तात्काळ आणि परिणामकारक हस्तक्षेप करण्यात आला. त्यामध्ये बाल शोषणाची ४३ प्रकरणे, इमोशनल सपोर्ट व समुपदेशनाच्या २५ प्रकरणे, घरातून पळून आलेल्या २८ बालकांना मदत, ४ बालकांना निवारा, ३१ बालकांना शैक्षणिक मदत, ११ भीक मागणाऱ्या बालकांची सुटका, २६ हरवलेल्या बालकांचा शोध, २० बालकांना शासकीय योजनांचा लाभ, ५ बालकांना वैद्यकीय मदत तसेच ८३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. ही आकडेवारी केवळ संख्या नसून, प्रत्येक आकड्यामागे एक वाचलेले बालपण, एक सुरक्षित भविष्य आणि एक नव्याने उभे राहिलेले जीवन दडलेले आहे.
विशेषतः बालविवाह रोखण्याच्या कार्यात ‘मुक्ती वाहिनी’ने निर्णायक भूमिका बजावत ८३ बालकांचे आयुष्य वाचवले आहे. हे यश केवळ संस्थेचे नसून, संपूर्ण यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. महिला व बाल विकास विभाग, बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, चाईल्ड हेल्पलाईन , पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्तरावरील विविध यंत्रणांचे मिळालेले सक्रिय सहकार्य आणि समन्वय यामुळेच प्रत्येक प्रकरणात वेळेत हस्तक्षेप करून बालकांना सुरक्षितता मिळवून देणे शक्य झाले आहे.
‘मुक्ती वाहिनी’चा एक अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी उपक्रम म्हणजे नाईट पेट्रोलिंग. रात्रीच्या वेळी जेव्हा शहर शांत झोपेत असते, तेव्हा ‘मुक्ती वाहिनी’चे कार्यकर्ते मात्र बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे आणि पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत असतात. अंधारात हरवलेल्या, घाबरलेल्या किंवा संकटात सापडलेल्या बालकांचा शोध घेत, त्यांना सुरक्षिततेचा हात देण्याचे हे कार्य अत्यंत मानवी आणि हृदयस्पर्शी आहे. या उपक्रमातून २८ बालकांना सुरक्षितपणे शोधून त्यांना बाल कल्याण समितीमार्फत संरक्षण देत, पुढे पालकांच्या ताब्यात सुखरूप सोपवण्यात आले.
या संपूर्ण कार्यामागे स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष जया ताई जोगदंड, सचिव प्रीती भोंबे, तसेच संस्था पालक राजीव गुजर, मिलिंद कुलकर्णी, ॲड. श्याम असवा, संचालक हनिफ शेख, ॲड. बागेश्री जरंडीकर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे. उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या नेतृत्वाखाली संतोष धर्माधिकारी, शाहिद शेख, सीमा जुनी, विनायक महाले, प्रतीक्षा वाघ, नेहा धिवरे, महेश शिंदे, पूजा दहातोंडे, निशा वाघ, कुणाल कदम आदी कार्यकर्ते २४ तास, ७ दिवस बालकांच्या हक्कांसाठी अहोरात्र कार्यरत राहून प्रत्येक बालकापर्यंत मदतीचा हात पोहोचवत आहेत.
‘मुक्ती वाहिनी’ ही केवळ हेल्पलाइन नसून, ती बालकांच्या सुरक्षिततेची हमी, त्यांच्या हक्कांची जाणीव आणि त्यांच्या भविष्यासाठीची जबाबदारी आहे. प्रत्येक संकटग्रस्त बालकापर्यंत वेळेत, संवेदनशील आणि प्रभावी मदत पोहोचवण्याच्या ध्येयाने ही सेवा कार्यरत आहे.
समाजातील प्रत्येक नागरिकानेही या कार्यात सहभागी होत, कुठेही बालविवाह, बालशोषण, बालश्रम किंवा संकटात असलेले बालक आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कारण आपल्या एका सतर्कतेमुळे एखाद्या बालकाचे आयुष्य बदलू शकते.
‘मुक्ती वाहिनी’ – बालकांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर!
—
आपला नम्र,
प्रविण कदम
प्रकल्प व्यवस्थापक
उडान प्रकल्प, स्नेहालय
📞 9011026495
