अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची सच्ची अभिव्यक्ती असते.
द्वेष आणि उन्मादातून विचार आणि कृतीत आलेली हिंसा भारतीय संस्कृतीसह जगातील सर्व धर्म आणि अध्यात्मिकता यांचा विनाश घडवीत असल्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. अभय बंग यांनी येथे दिला .
स्नेहालय संस्थेचे वर्ष 2025 – 26 चे बा, बापू , विनोबा आणि आदर्श शिक्षक पुरस्कार काल प्रदान करण्यात आले.
यावेळी पद्मश्री डॉ. अभय बंग, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ.सुरेश पठारे, नगरच्या औद्योगिक विकास प्रक्रियेचे मार्गदर्शक अरविंद पारगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक क्षेत्रातील कर्मयोग्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून सामाजिक संस्थांचे 300 हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
==============
*शोध स्वधर्म आणि ईश्वराचा*
===============
या कार्यक्रमाचे प्रमुख संवाद असणारे डॉ.बंग यावेळी म्हणाले की, वंचितांची सेवा करीत असतानाच स्वतःचा, स्वधर्माचा आणि आपापल्या ईश्वराचा शोध लागतो. कस्तुरबा आणि महात्मा गांधी यांच्या आश्रमात आपले बालपण गेले तर विनोबांचे बोट धरून भूदान पदयात्रेत चालता आले. सरकारी यंत्रणा, राजसत्ता आणि कायद्याचा बडगा वापरून किंवा आर्थिक लाभाची खैरात करून स्थायी स्वरूपाचा सामाजिक – मानसिक आणि आर्थिक बदल घडत नाही, हा या तिघांनी दिलेला मूलभूत विचार होता. सर्व जग युद्धाची होरपळ अनुभवत असताना प्रेम – करुणा – माणुसकी आणि अहिंसक संवादातुनच आपला देश आणि विश्व वाचवण्याचे उपाय सापडतील, असे डॉ. बंग म्हणाले.
पुरस्कार प्राप्त सामाजिक संस्थांनी रचनात्मक काम करताना समाजाच्या सर्वात तळातला आणि अस्वस्थ करणारा माणूस सतत स्मरला. बा,गांधी आणि विनोबांचा विचार त्यामुळे त्यांच्या कामातून व्यक्त होतो..
बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि संतांच्या क्रांतिकारी परंपरा
काही सामाजिक संस्थांनी आपल्या कामातून निष्ठेने अनुसरल्या. गेली चार दशके अविरत कार्यरत असलेली स्नेहालय संस्था त्यात अग्रणी आहे.
लैंगिक शोषित महिला, एड्सबाधित, बालवधू, बालमाता , बाल लैंगिक शोषित, अनाथ मुले, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण अशा मूलभूत प्रश्नांना रचनात्मक प्रतिसाद देण्याचा मार्ग स्नेहालयाने दाखविला.
================
*संस्थांचे सक्षमीकरण*
================
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या सचिव डॉ. प्रीती भोम्बे म्हणाल्या की, पुरस्कारप्राप्त संस्थांशी स्नेहालय आपले देणगीदार आणि संसाधने यानिमित्ताने जोडून देते. सेवा संवर्धन कार्यशाळेच्या माध्यमातून अशा संस्थांच्या सक्षमीकरणात आणि शाश्वतीकरणात हातभार लावते.
वर्ष 1995 पासून आजवर 600 हून अधिक सामाजिक संस्थांना आणि कार्यकर्त्यांना अशा पुरस्कारांद्वारे स्नेहालयने प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वाती रानडे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड यांनी केले.
==============
*सेवाप्रेरणांचा गौरव*
================
यावेळी *बा* ( कस्तुरबा गांधी ) पुरस्काराने हावडा ( बंगाल) येथील समरिटन हेल्प मिशन या संस्थेच्या सहसंस्थापिका श्रीमती शबाना मामुन अख्तर यांना गौरविण्यात आले. मागील 3 दशकात त्यांनी 50 आजारांवर बालकांना शिक्षण आणि महिलांना रोजगार कौशल्यासह सक्षम केले.
बापू ( महात्मा गांधी ) पुरस्काराने तळ – कोकणातील *जीवन आनंद*, या संस्थेचे संस्थापक दांपत्य सौ.भक्ती आणि संदीप परब यांना गौरविण्यात आले. मागील 20 वर्षात त्यांनी 10 हजारांवर मनोरुग्ण ,अनाथ आणि निराधार यांचे उपचार आणि पुनर्वसन केले. राष्ट्रसंत विनोबा पुरस्काराने आर्वी ( जिल्हा बीड) येथील शांतीवन प्रकल्पाचे संस्थापक सौ.कावेरी आणि दीपक नागरगोजे या दांपत्याच्या कार्याला गौरविण्यात आले. त्यांनी अनाथ ,वंचित आणि विशेषतः ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय मागील 25 वर्षांपासून केली. दुष्काळी आर्वी परिसर जलसमृद्ध करून येथील ऊस तोडी साठी होणारे विस्थापन कायमचे रोखले.
आदर्श शिक्षक पुरस्काराने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत वैश्विक दर्जाचे शिक्षण देणारे दत्तात्रय वारे गुरुजी, नगरच्या झोपडपट्ट्यात शालाबाह्य मुलांना शिक्षणाची गोडी लावणारे सचिन वैजनाथ वाघ आणि स्नेहालय इंग्रजी माध्यम शाळेत विशेष गरजयुक्त बालकांसाठी मातृभावनेतून शिकवणाऱ्या चंद्रकला कराळे यांचा सन्मान झाला.
बा,बापु आणि विनोबा पुरस्कार प्रत्येकी 50,000/- तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रत्येकी 10 हजार रुपयांचे आहेत. पुस्तके , सन्मानपत्र , स्मृतिचिन्ह इ. चा यात समावेश होता.
या पुरस्कारांसाठी पुणे येथील आदर्श शिक्षिका स्वर्गीय इंदिरा आणि माजी आमदार श्यामकांत मोरे तसेच शिक्रापूर येथील स्वर्गीय सीताबाई आणि रावसाहेब मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक सहयोग दिला.
