पारनेर / भगवान गायकवाड,         
      विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक जगाची ओळख करून देण्यासाठी पारनेर येथील आनंद मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन संचलित जिजामाता सेमी इंग्लिश स्कूल, चाटे किड्स आणि राजीव गांधी विद्यालयाच्या प्रांगणात ‘बाल आनंद मेळावा २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

     या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याच्या स्टॉलला पालकांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमाचे उद्घाटन पारनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विनेश लाळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे तज्ज्ञ मार्गदर्शक आंबेकर सर, संस्थेचे संस्थापक डॉक्टर सादिक राजे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष ठाणगे सर तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना लाळगे म्हणाले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांना पैशांचे नियोजन तसेच ग्राहक-विक्रेता संबंधांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळते. शाळेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”

मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सजवलेली ‘खाऊ गल्ली’ होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले चटकदार पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. चटकदार भेळ, ढोकळा, पॅटीस, गरमागरम समोसे, गुलाब जामुन, पाणीपुरी, वडापाव आणि गाजराचा हलवा अशा अनेक पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.

खाद्यपदार्थांसोबतच विद्यार्थ्यांनी ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचे स्टॉलही लावले होते. विशेष म्हणजे, आगामी मकर संक्रांतीचा सण लक्षात घेऊन महिलांना लागणारे वाण आणि पूजेचे साहित्य विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते, ज्याला महिला वर्गाकडून विशेष पसंती मिळाली.विद्यार्थ्यांनी केवळ वस्तूंची विक्रीच केली नाही, तर नफा-तोटा, हिशोब आणि संवाद कौशल्य देखील आत्मसात केले. चिमुकल्या हातांनी केलेला हा व्यवसाय पाहून उपस्थित पालकांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ वर्गात न शिकवता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यासाठी या मेळाव्याचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वाढावे आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश होता. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्टॉलचे सूक्ष्म नियोजन करून त्यांना मार्गदर्शन केले.संस्थेचे संस्थापक डॉ. सादिक राजे आणि मुख्याध्यापक ठाणगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि पालकांच्या सहकार्याने हा बाल आनंद मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version