पारनेर / भगवान गायकवाड, 

       निसर्गाचा कोप आणि सूर्याची आग ओकणारी दाहकता वाढू लागली की, मानवासोबतच निसर्गातील वन्यजीवांचीही मोठी घालमेल होते. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. अशा कठीण काळात शहाजापूर वनविभागातील वन्यप्राण्यांसाठी ‘माणुसकी’ धावून आली आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनुळे आणि विजय साबळे यांनी स्वखर्चाने पाणवठ्यात पाणी सोडून या मुक्या जीवांची तहान भागवत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती….
शहाजापूर, सुपा आणि हंगा या तीन गावांच्या सीमेवर निसर्गरम्य आणि मोठे वनक्षेत्र विस्तारलेले आहे. या भागात विविध प्रकारचे पक्षी आणि वन्यप्राण्यांचा मोठा वावर असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात निसर्ग साथ देतो, मात्र जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात निसर्गाची कूस कोरडी पडते. पाण्यासाठी या जीवांना वणवण भटकावे लागते. हीच अडचण ओळखून वनविभागाने येथे कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत, जे आता दानशूर व्यक्तींच्या मदतीने ‘जीवनदायी’ ठरत आहेत.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
सेवाभावी हातांची साथ….
मागील काही दिवसांत सुपा येथील ‘प्रेक्षा मेडिकल’चे संचालक श्री. राहुल सोनुळे आणि ‘गुरु मोटर ड्रायव्हिंग स्कूल’चे संचालक विजय साबळे यांनी टँकरद्वारे या पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले. विशेष म्हणजे, सुपा गावचे सरपंच योगेशशेठ रोकडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने या उपक्रमात पुढाकार घेत आहेत. त्यांना सुप्यातील पाणीपुरवठादार पप्पूशेठ पवार यांची मोलाची साथ लाभत असून, ते ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर तात्काळ पाणी टँकर उपलब्ध करून देत आहेत.”वाढत्या उन्हामुळे वन्यजीवांचे हाल होत आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीप्रत्यर्थ या पाणवठ्यात पाणी सोडावे आणि पक्षांसाठी धान्य उपलब्ध करून द्यावे. आवाहन पारनेर तालुका पत्रकार संघाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version