पारनेर / भगवान गायकवाड,
चिंचोली (ता. पारनेर) येथील श्री मळाई वडजाई मळगंगा देवीच्या चैत्र यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून, ही यात्रा गुरुवारी ९ एप्रिल पासून प्रारंभ होत असल्याची माहिती देवस्थान चे सचिव आनंदराव पिंपरकर यांनी दिली. देवीची हळद लावण्याच्या विधीने 2 एप्रिल रोजी प्रारंभ झाला.यात्रेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साह असून, विविध धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील चिंचोली येथे मळगंगा मळाई देवीचे पुरातन मंदिर आहे. राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असून यात्रेनिमित्त राज्यभरातील भाविक मोठ्या प्रमाणावर येतात.यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला, गुरूवार ९ एप्रिल रोजी पहाटे गावतून मोठ्या भक्तिभावाने पालखी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत भक्तगण दंडवत घालून सहभागी होतील. त्यानंतर दिवसभर मंदिरात महाप्रसाद व अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांच्या सहभागाने विविध धार्मिक विधी होतील.
पंचकोशीतील भाविक आपल्या कुलदैवताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंदिरात गर्दी करतील. दुपारी मानाच्या पालखीसोबत पूजन व मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर देवीला खास नैवेद्य अर्पण करण्यात येईल.
शुक्रवार दहा एप्रिल रोजी भव्य बैलांचा शर्यतीचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेला मोठा इतिहास लाभलेला असून, या यात्रेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती, चिंचोली ग्रामस्थ,मुंबईकर मित्र मंडळ, यांनी केले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
पुणे जिल्ह्यासह राज्यातील भाविक
मळाई यात्रा साठी पारनेर तालुका,नगर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील खेड,ओतुर, आळेफाटा,मंचर, जुन्नर येथून,राज्यातुन भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. त्यांचे कुलदैवत असल्याने बैलगाडी ने यात्रेला भाविक येतात.
🔶🔶🔶🔶🔶🔶
७० एकरातील निसर्गरम्य परिसरात मंदिर
चिंचोली च्या मळाई देवीला सुमारे ७० एकराचे परीसर असून चिंच च्या वनराई ने मंदिर परीसर हिरवाई ने नटला आहे. भाविकांच्या सहभागातून राजस्थान मधील लाल रंगाचे दगडातील कोरीव काम करून मंदिर जिर्णोद्धार केला आहे.
